पालघर दि २४ फेब्रुवारी पालघर प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पालघरचा चेहरा*संतोष शिवराम जनाठे यांची प्रदेश चिटणीसपदी वर्णीपालघर : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत पालघर जिल्ह्याला महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले असून, येथील ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष शिवराम जनाठे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नव्या कार्यकारिणीत ही नियुक्ती करण्यात आली.या निवडीत प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, महिला मोर्चा आदी विविध जबाबदाऱ्यांवर अनुभवी खासदार व आमदारांना संधी देण्यात आली असून, त्याचवेळी तळागाळातून पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रदेश स्तरावर स्थान दिल्याने पालघर जिल्हा भाजपमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.संघपरिवाराच्या विचारधारेतून घडलेले श्री. जनाठे यांनी अनेक वर्षे विस्तारक म्हणून काम करत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चाही झाली होती. मात्र पक्षाने डॉ. हेमंत सावरा यांना संधी दिली. तरीही पक्षनिष्ठा कायम ठेवत श्री. जनाठे यांनी प्रचार व संघटनात सक्रिय भूमिका बजावून विजयात मोलाचा वाटा उचलला.राजकीय कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ‘बिरसायत’ संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतून अनेक तरुणांना नोकरी व स्वयंरोजगाराची संधी मिळाली आहे.या नियुक्तीमुळे पालघर जिल्हा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह संचारला असून, आगामी काळात पक्षसंघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




