Uncategorized

राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप स्थगित

Share News

राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप स्थगित

पालघर : फझल शेख 

राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी सुरू केलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने २१ एप्रिल २०२६ पासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला होता. या संपात सुमारे १७ लाख कर्मचारी-शिक्षक सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले होते.

दरम्यान, २४ एप्रिल रोजी शासनासोबत झालेल्या बैठकीत सुमारे १८ महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करण्याबाबत, निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सेवा अटी, तसेच विविध भत्त्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाने दिले.

तसेच, १ मार्च २०२४ पासून निवृत्त झालेल्या सुमारे ६५०० कर्मचारी-शिक्षकांना निवृत्तीवेतनाचे लाभ देण्याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेबाबत, तसेच १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनुसार प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नगरपालिका व नगरपरिषदांच्या आकृतिबंधासंदर्भात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णयही चर्चेत घेण्यात आला. सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार, शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ठराविक कालावधीत केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला बेमुदत संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कार्यालये, शाळा व इतर सेवा पुन्हा सुरळीत होणार आहे.


Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *