पालघर : शिरगाव येथे सुरू असलेल्या ग्लोबल कोकण सरस महोत्सव २०२६ मध्ये पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचा स्टॉल विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. वंजारी समाजाचा समृद्ध इतिहास, २४ गावांचा सामाजिक प्रवास, भटक्या व्यापारी परंपरेपासून आधुनिक नेतृत्वापर्यंतची वाटचाल, चालीरीती-परंपरा, भाषा, आडनावे तसेच शिक्षणाच्या माध्यमातून साधलेली प्रगती यांचे प्रभावी सादरीकरण या स्टॉलमध्ये करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, वसई-विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर
राजीव पाटील, जीएसटी विभागाचे आयएएस अधिकारी नितीन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगरसेवक भावानंद संखे, अमिश पिंपळे आदी मान्यवरांनी स्टॉलला सदिच्छा भेट दिली.
मान्यवरांनी वंजारी समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, चोवीस गावांची सामाजिक रचना तसेच शिक्षणामुळे साधलेली प्रगती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. स्त्री शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने समाजाने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी स्टॉलमधील माहितीची आस्थेने पाहणी करून समाधान व्यक्त केले, तर खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी वंजारी समाज हा शिक्षणामुळे झपाट्याने प्रगती करणारा समाज असल्याचे गौरवोद्गार काढले.
स्टॉलमध्ये “वंजारी हिताय, वंजारी सुखाय” हे ब्रीदवाक्य आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले असून समाजाच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला जात आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या वंजारी समाजबांधवांनी स्टॉलला भेट देत समाज बॅज अभिमानाने परिधान केला.
हा महोत्सव २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन वंजारी समाजाचा इतिहास व सांस्कृतिक वारसा जाणून घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळातर्फे करण्यात आले आहे.


