जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे मतदारांना आवाहन; ASDD यादीत नाव असल्यास तातडीने BLO शी संपर्क साधण्याचे निर्देश
पालघर | दि. १३ ऑगस्ट २०२६
फझल शेख
मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) पालघर जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण तसेच ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) मतदारांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत ASDD यादीत नाव आढळून येते, मात्र संबंधित मतदार प्रत्यक्षात त्याच ठिकाणी वास्तव्यास आहे, अशा पात्र मतदारांनी १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे EF फॉर्म व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची तसेच अधिकृत प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि SIR अंतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
ASDD यादीत नाव आहे? तातडीने पडताळणी करा
SIR अंतर्गत BLO मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आढळून न आलेले (Absent), स्थलांतरित (Shifted), मयत (Dead) आणि दुबार (Duplicate) मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत आवश्यक EF फॉर्म भरून घेता न आलेल्या मतदारांची ASDD यादी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एखाद्या नागरिकाचे नाव या यादीत आले असेल, मात्र तो मतदार प्रत्यक्षात अस्तित्वात असून त्याच मतदारसंघात आणि त्याच ठिकाणी वास्तव्यास असेल, तर संबंधित मतदाराने विलंब न करता BLO शी संपर्क साधावा. आवश्यक EF फॉर्म आणि कागदपत्रे सादर करून आपली नोंद अद्ययावत करून घ्यावी.
EPIC क्रमांक टाकून मिळवा BLO चा संपर्क क्रमांक
मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Services Portal वर आपला EPIC अर्थात मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक मिळवावा. त्यानंतर BLO शी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.
यामुळे ASDD यादीत समाविष्ट झालेल्या पात्र मतदारांची पडताळणी करून त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची EF नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
१७ ऑगस्टची मुदत; मतदारांनी दुर्लक्ष करू नये
ASDD यादीतील नावांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील निवडणूक विभागाचा वापर करता येणार आहे. मतदार यादीत आपले नाव कायम राहावे आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सहकार्य मिळावे, यासाठी प्रत्येक मतदाराने ASDD यादी तपासून आवश्यक कार्यवाही १७ ऑगस्टपूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे.
पात्र मतदारांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
