ताज्या बातम्या

महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिन उत्साहात साजरा‘पालघर महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणार’ — जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

Share News

पालघर, दि. ३ ऑगस्ट २०२६ : महसूल विभागाचा चेहरामोहरा बदलत असून तो केवळ महसूल वसुलीपुरता मर्यादित न राहता नागरिककेंद्री विकासाला गती देणारा प्रमुख विभाग बनला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करत शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महसूल दिन आणि पालघर जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके, आयएएस (प्रशिक्षणार्थी) पी. व्ही. अमल, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, विजया जाधव, तेजस चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. जाखड म्हणाल्या की, १ ऑगस्ट २००२ पासून महसूल दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे महसूल प्रशासन अधिक नागरिकाभिमुख करणे होय. स्वातंत्र्यानंतर महसूल विभागाची भूमिका सातत्याने बदलत गेली असून आज हा विभाग महसूल संकलनाबरोबरच विकास, जनकल्याण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

गेल्या वर्षभरात सातबारा उताऱ्यावरील हक्क सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विशेषतः वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातबारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही दीर्घ संघर्षानंतर साकार झाली असून हा महसूल विभागासाठी अभिमानाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महसूल विभाग कृषी, ग्रामविकास, भूमी अभिलेख, मुद्रांक व नोंदणी आदी विभागांशी प्रभावी समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात सर्व विभाग एकाच प्रशासकीय इमारतीत कार्यरत असल्याने हा समन्वय अधिक परिणामकारक ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आपत्ती व्यवस्थापनात महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करताना, अलीकडील अतिवृष्टीदरम्यान विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, ‘सर्वांसाठी घरे’ अभियान, तसेच २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमन यांसारख्या निर्णयांमधून शासनाचा नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून, शासनाच्या योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

पालघर जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांच्या भूमिकेचा उल्लेख करत, “पालघर हे भविष्यात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. पुढील पाच ते दहा वर्षांत औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार असून हा विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *