
डहाणू | संपादक : फजल शेख
डहाणू नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दमदार तयारी करत सहा उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. अनुभवी तसेच उच्चशिक्षित युवा चेहरे निवडणुकीत उतरवत शहरासमोरील मूलभूत समस्यांना तोडगा काढण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे.
राहुल गांधींचे विश्वासू युवा नेता कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी “डहाणू शहर समस्या मुक्त करणे हाच आमचा मुख्य नारा आहे,” असे सांगत पक्षाच्या उमेदवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. डहाणूतील तळा-गळातील समस्या कचरा व्यवस्थापन, अस्वच्छता, अरुंद रस्ते, फुटलेली गटारे, महिलांची पाणी समस्या, घटलेला शिक्षण स्तर आणि सुसज्ज रुग्णालयाची गरज—या सर्व मुद्द्यांवर ठोस काम करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार बांधिल आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष पदासाठी हाफिजूल रेहमान खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, दोन वेळा नगरसेवक राहिलेले अनुभवी संतोष मोरे (वार्ड क्र. १-ब), तसेच जनतेच्या प्रश्नांना लेखणीद्वारे वाचा फोडणारे पत्रकार रफीक घाची (वार्ड क्र. १०) यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.
त्यांच्यासोबत ऍड. जय मावळे, समर्थ मल्हारी आणि सागर पवार या उच्चशिक्षित युवा उमेदवारांनाही काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. युवा-उमेदवारांचे शहरातील समस्या व स्थानिक गरजांवरील आकलन पाहून पक्ष नेतृत्व समाधान व्यक्त करत आहे.
डहाणू नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी या वेळी राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू आणि ‘भारत यात्री’ कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. “डहाणूत सुधारणा, विकास आणि हुकूमशाहीविरोधातील लढाईत काँग्रेसचे उमेदवार नक्कीच विजयी होतील,” असा ठाम विश्वास कॅप्टन ठाकूर यांनी व्यक्त केला.




