
डहाणू | प्रतिनिधी
डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठा निर्णय घेत वरिष्ठ नेतृत्वाने दोन पदाधिकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. नगराध्यक्ष पदाचे माजी उमेदवार हाफिजूल रेहमान खान आणि तालुका अध्यक्ष संतोष मोरे यांनी पक्षाला विश्वासात न घेता अचानक निवडणूक स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या रिक्त पदासाठी काँग्रेसने जलद निर्णय घेत वर्षा वायडा यांची डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. मागील निवडणुकीत केलेली दमदार लढत, सक्रियता आणि पक्षनिष्ठा पाहता त्यांना हक्काची संधी मिळाल्याचे मानले जात आहे.
या घडामोडीनंतर तालुक्यातील काँग्रेस संघटनेत नवीन ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत पक्षाला गती देण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




